काही गाणी मनात घर करतात ,आणि महत्वाचं म्हणजे ती कळू लागली कि जरा अधिकच. असंच एक गाणं जे मी कधीतरी ऐकलं होत पण समजलं आणि मनाला भिडलं ते माझे आजोबा कमलाकर बनसोड (भाऊसाहेब) २००९ साली गेले तेव्हा. वयाच्या ८४ व्या वर्षी गेले असले तरी, चालत बोलत , सगळ्यांच करत गेले, अगदी धक्का आणि मनाला चटका देऊन. तेव्हा ते गाणं ऐकल्यावर समजायला लागलं. “घर थकलेले संन्यासी…”—या ओळी घराकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन बदलून टाकतात. घर हे केवळ वास्तू नसून, काळ, नाती आणि अनुभव यांचं एक जिवंत संचित असतं. जेव्हा घर “थकतं”, तेव्हा भिंती खचत नाहीत; तर त्यांना जिवंत ठेवणाऱ्या आठवणींचा ओघ मंदावतो. आणि म्हणूनच घर समजून घेण्यासाठी त्याच्या भौतिक रचनेपेक्षा त्यात जगलेल्या जीवनाकडे पाहणं अधिक महत्त्वाचं ठरतं हे अगदी प्रकर्षाने कळायला लागलं. आजोबा गेले तेव्हा आजी पुढचे दोन वर्ष तिथे होती.
परवा—३० एप्रिल २०२६ —आजी गेली. आईची आई म्हणून बघितलं तर एक वृद्ध ९५ वर्षांची बाई वृद्धापकाळाने गेली, मुक्त झाली. पण जेव्हा तिला लोधीखेडच्या वाड्याशी जोडून पाहिलं तर खऱ्या अर्थाने वाड्या शी जोडलेली शेवटची जिवंत कडी गेली. तिच्या जाण्यानंतर प्रकर्षाने जाणवलं—घरं माणसांनी जिवंत राहतात. ती होती तोपर्यंत त्या वाड्याचं नाव, त्याची ओळख, त्याची ऊब —सगळं तिच्या संभाषणात जिवंत होतं. जणू त्या वाड्याचा श्वास तिच्या आठवणींमध्ये होता. “आईच्या डोळ्यांमधले नक्षत्र” ही गाण्यातील प्रतिमा इथे अजुनच मला स्पष्ट झाली. घराला जिवंत ठेवणारं केंद्र एखादं व्यक्तिमत्त्व असतं. आजोबा गेले तेव्हा त्या वाड्याचं “वैभव” गेल्यासारखं झाल, तो वाडा पोरका झाला. आजोबांकडून त्याच्या सगळ्या गोष्टी ऐकल्या होत्या. कदाचित त्यामुळे... अगदी कमी वयात त्यांचे वडील सीताराम पंत बनसोड गेले तेव्हा त्यांनी ते घर , आई, आजी , भावंडं सगळ्यांना कसं सांभाळल, ते कळलं होत . कष्ट होते , प्रेम होत आणि चिकाटी हि. त्यानेच त्याचं वैभव होतं. पुढे आजी होती तोपर्यंत तिच्यात तो वाडा सोडल्याची एक सल जिवंत राहिली. ती जिथे असेल तिथे वाड्याच्या आठवणींचं गाणं सतत सुरू असायचं. खरं तर तिच्या स्मरणांनी त्या वाड्याच्या आठवणींना अर्थ मिळत होता. पण आता, त्या आठवणी सांगणारी व्यक्तीही गेल्यावर, घराचं जिवंतपण कमी झाल्यासारखं वाटणं स्वाभाविक आहे.आता वाडा तिथेच आहे, पण त्याचं “घरपण” थोडंसं शांत झालय.महिनाभरापूर्वी त्या जामसावळीला गेले असताना , मामाला फोन लावला आणि गाडी लोधीखेड्याकडे वळवली —मुलीला वाडा दाखवण्यासाठी. पण खरं तर मला त्याची भेट घ्यायची होती. त्या भेटीत जाणवलं की घर हे भूतकाळाचं संग्रहालय नसून पिढ्यांमधील संवादाचं माध्यम आहे. त्या वाड्याचा तो मोठा लाकडी दरवाजा,अंगण ,तुळशीवृंदावन, बैठक,देवघर, माजघर,अंधारकोठडी , वखारी, वाड्याची प्रत्येक माडी, सामटी, काय आठवतंय आणि काय नाही —प्रत्येक जागा एखाद्या क्षणाची साक्ष देत होती. पण या जागा केवळ स्थिर नव्हत्या; त्या अनुभवांनी भरलेल्या , स्थिरावलेल्या स्तब्ध होत्या. खूप काही पहिलं होत या घराने. संघाच्या बैठकी, स्वयंसेवक, आणि बाणी चा काळ .... असो, आजी ने मात्र प्रत्येक वेळी साथ दिली. या घरात येणारा कोणीही कधी उपाशी पोटी गेला नाही.— म्हणतात ना , माणूस जातो, पण उरतात त्या फक्त आठवणी, हे खरंच आहे.तसा , त्या वाड्यात पाय ठेवताच येणारा आनंद आजही तितकाच जिवंत आहे, हे त्या दिवशी जाणवल . पाय ठेवल्याबरोबर आज हि आजोबांचा जोराचा आवाज येईल असाच भास होतो. —त्यावेळी जणू ते घर स्वतःच आपलं स्वागत करत आहे, अशी भावना निर्माण व्हायची. आजोबांच्या त्या आवाजात केवळ अधिकार नव्हता; तो आपलेपणाचा, सुरक्षिततेचा आणि घरात परत आल्याचा एक उबदार स्पर्श होता. अंगणाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत धावताना वाटणारी मजा, उन्हाळ्यात अंगणात जाण्याची परवानगी नसतानाही चोरून जाण्यात मिळणारा आनंद—ही लहानशी बंडखोरीही त्या घराच्या जिवंतपणाचा भाग होती.
त्या घरातलं छोटंसं देवघरही तितकंच जिवंत होतं, आज ते आहे पण त्याचा आत्मा हरवलाय. आजी त्या देवघराभोवती आणि त्या तुळशी वृन्दावाना भोवती प्रदक्षिणा घालताना दिसायची, आणि आजोबा शांतपणे पूजा करत बसायचे. आता ते देवघर बघितला कि आठवणींचा काटा बोचतो. खूप खूप आठवणी आहेत. कदाचित अस बालपण जगणारे आम्ही आणि आमची ती शेवटची पिढी त्या घरातली.रात्री आठ वाजताच गावात अंधार पडत होता, लाईट्स जात होते तेव्हा तिथे खूप, आणि मग कंदिलाच्या प्रकाशात सगळं घर एकत्र यायचं. झुल्यावर झोके घेत, गाणी म्हणत, अंताक्षरी चा कल्लोळ चालत होता. आठवी , रामनवमीला होणारा उत्सव, तेव्हा होणारे कीर्तन, गप्पा, उठणाऱ्या पंगती ,गोंगाट, लोकांची ये-जा—हे सगळं त्या वाड्याच्या धमन्यांमधून वाहणारं रक्त होतं.
अंगणात वाळणं टाकलेलं असायचं—आंब्याच्या पोळ्या उन्हात सुकत असलेल्या, आणि माडी वर माचाला ठेवलेले लाडू आंबे. मग बादल्यांमध्ये आंबे घेऊन बसणं, ते आंबे चोखत गप्पा मारणं—हे केवळ उन्हाळ्याचे क्षण नव्हते; ते एकत्र जगण्याचे क्षण होते. आजोबा आमच्यासाठी आंब्याच्या पोळ्या करायचे, आणि आजी त्या जपून, प्रत्येकाला मोजून देत डब्यात ठेवायची— आज हि हे सर्व कालच झाल्यासारखं वाटतं.
परवा तिला जाताना बघितलं तेव्हा सगळंच आठवत होतं. ती गावाहून आलेली आणि नातेवाईक लोकं पाहिली आणि सगळंच पुन्हा डोळ्यांसमोर उभं झालं. कोणासाठी ती आई होती, तर कोणाची काकू, कोणासाठी सिंधू ताई तर कोणासाठी कमल वहिनी, कोणाची तरी मामी तर कोणाची मावशी ,आमची आजी तर कोणाची आंबा आज्जी, कोणीतरी काहीतरी तिला म्हणत असे, इतकी सगळी नाती तिने जपली होती. आज हि सगळी नाती तिला शेवटचा निरोप द्यायला आलेली होती. त्या सगळ्यांना पाहून काहीतरी जाणवत होत , पण काय ते सांगता येत नाही. आपण मॉडर्न आहोत, तेव्हा अश्या गोष्टी ड्रॅमॅटिक वाटतात म्हणून असेल कदाचित. पण तो वाडा तिची ओळख होती. तिथेच तिने या सगळ्यांना त्याच्या हिस्स्याची ती दिली होती. त्याच्या बाहेर तिला कोणी ओळखावं असं कदाचित तिलाही कधी वाटलं नसावं.
आजीच्या जाण्याने आज पुन्हा या सगळ्या गोष्टी जगाव्याश्या वाटल्या, सगळ्यांसाठी झट झट झटणारी ती , काही वर्षांपासून वेगळ्याच विश्वात होती, वाडा मात्र त्या विश्वाचा अविभाज्य भाग होता. पाहटे ४ पासून रात्री पर्यंत त्या घरात वावरणारी ती , तिथून कधी स्वतःचं मन काढूच शकली नाही. कस जमेल तिला ते, आम्हाला अजून जमलं नाही. कारण खरं सांगू का जेव्हा घर आपलं असत ना, ज्याला आपण सांभाळतो, आपलं म्हणतो, आपलं सर्वस्व देतो, त्या घरात आपण राहत नाही, ते घर आपल्यात राहतं. तीच कदाचित तसच होतं. आता ती गेलीये (मान्य, हे साहजिक आहे आणि नैसर्गिक हि), पण घर अजून आहे, थकलेलं , पण अजूनही कितीतरी आठवणींची शिदोरी बांधून उभं असलेलं. एका विरक्त संन्यासासारखं !!
.jpeg)

.jpeg)

No comments:
Post a Comment